मसाल्यांबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अद्ययावत: 2026-10-16
मसाला किती टिकतो, गठ्ठे का पडतात, प्रमाण किती घ्यावं - स्वयंपाकघरात रोज पडणारे प्रश्न आणि त्यांची सरळ उत्तरं.
- मसाला किती दिवस टिकतो?
- न उघडलेलं पॅकेट पॅकिंगपासून साधारण नऊ महिने ते एक वर्ष. उघडल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवलं तर तीन ते सहा महिने चांगला राहतो. अख्खे मसाले पावडरपेक्षा जास्त टिकतात.
- मसाल्याला गठ्ठे का पडतात?
- ओल लागल्याने. डब्यात ओला चमचा घातला, डबा गॅसजवळ उघडा ठेवला, किंवा झाकण नीट बसलं नाही - यापैकी काहीतरी झालेलं असतं. गठ्ठे पडलेला मसाला वापरता येतो, पण बुरशीचे डाग दिसले तर फेकून द्या.
- चार माणसांच्या भाजीसाठी किती मसाला घालावा?
- मिश्र मसाल्यांसाठी साधारण दोन ते अडीच चमचे. गरम मसाला आणि शाही गरम मसाला यासाठी एक ते दीड चमचा पुरेसा - ते जास्त झाले की कडवट लागतात. पहिल्यांदा वापरताना कमी घालून नंतर वाढवा.
- मसाला शिजवताना कधी घालावा?
- बहुतेक मसाले कांदा-टोमॅटो शिजल्यावर, पाणी घालायच्या आधी घालायचे - म्हणजे ते तेलात भाजले जातात आणि त्यांचा वास उघडतो. शाही गरम मसाला मात्र शेवटी, गॅस बंद करायच्या एक मिनिट आधी.
- मिरची पावडर करपते, काय करावं?
- मिरची पावडर गॅस चालू असताना थेट तापलेल्या तेलात घालू नका. गॅस बंद करून किंवा आच एकदम कमी करून घाला, किंवा थोडं पाणी शिंपडून मग घाला. करपलेली मिरची पावडर कडवट लागते आणि पदार्थ वाया जातो.
- मसाला फ्रिजमध्ये ठेवावा का?
- गरज नाही, आणि फायद्यापेक्षा तोटा जास्त. फ्रिजमधून बाहेर काढल्यावर डब्यावर ओल जमते आणि तीच आत जाऊन गठ्ठे पाडते. थंड, कोरडी आणि अंधारी जागा पुरेशी आहे.
- पॅकेटवरचं वजन आणि किंमत कुठे बघावी?
- प्रत्येक पॅकेटवर निव्वळ वजन, एमआरपी, पॅकिंगची तारीख आणि एफएसएसएआय क्रमांक छापलेला असतो. खरेदी करताना या चारही गोष्टी तपासून घ्याव्यात.